लाॅ ऑफ अट्रॅक्शन आणि जळजळ

कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला जळजळ होते का?

ह्यॅ ! मुळीच नाही, मी तसली/तसला नाही!

बरं आता प्रश्न बदलू

कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला त्याची लायकी नसताना त्याला ते मिळालंय असं वाटतं का?

हो, म्हणजे असं वाटतं खरं… म्हणजे असं का वाटू नये, तो माणूस चीड येईल असाच असतो तेव्हा असं वाटणारच ना…

कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्ही, नाराज होत असाल अन्याय समजत असाल त्याचा राग राग करत असाल तर LOA नुसार तुम्ही स्वतःच्या मार्गात मोठेमोठे धोंडे टाकत आहात! ब्रम्हांडाचं सगळ्यांवर सारखं प्रेम आहे, लाडकं दोडकं असं काही नाही, जसे तरंग Vibrations, जशी तुमची energy तशी प्रतिक्रिया हा LOA चा नियम आहे.

ज्यांचा संताप येतो ते मजा करताना बघून आपल्याला वाईट वाटत असेल तर एक समजून घेऊया की, ते असं काहीतरी करताहेत ज्यामुळे ब्रम्हांड त्यांना ते सगळं देतंय जे पाहून बघणा-यांचा आणखी जळफळाट होतोय!

ते काय असू शकेल?

कदाचित आपल्याकडे सगळं आहे या समाधानाच्या भावनेत ते असतील, त्यामुळे इतरांना काही देतांना, दान करताना ते खुल्या मनानं देत असतील, स्वतःचा विचार करत असतील,आरोग्याची काळजी घेत असतील तर ही एक प्रकारची कृतज्ञता आहे ज्यानं LOA दुपटीनं काम करतो.कारण जे मिळालंय त्याची व्हॅल्यू आपण करत नाही पण ते करतात म्हणून ब्रम्हांड त्यांना झुकतं माप देत असेल.

त्यामुळे देवच अन्याय करतो, या जगात न्यायच नाही, आई धाकट्या भावाचेच लाड करते माझे नाही असं म्हणणा-या रुसलेल्या लहान मुलासारखी चरफड न करता सूक्ष्म निरिक्षण सुरु करा.जगात कुणालाही पात्रतेपेक्षा जास्त किंवा कमी काही मिळत नाही, आज मजा करणा-याचा भूतकाळ कसा होता? आपल्याला माहीत नाही, त्यानं आत काय भोगलंय आपल्याला माहीत नाही, त्यानं काय त्याग केलाय, संघर्ष केलाय आणि भविष्यातल्या कशावर पाणी सोडलंय किंवा भविष्यात त्याला त्याची काय किंमत चुकवावी लागेल हे *आपल्याला* या जन्मात कळायला मार्ग नाही, मग कशाला जज करा, कशाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची!

मजा मजा करत खिदळणा-यांना ती मजाच सजा झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत, तेव्हा मला त्यांचं किती छान असं वाटायचं पण आज मला त्यांची दया येते आणि ते न देऊन देवानं आपल्याला वाचवलं म्हणत मी देवाला थँक्यू म्हणते. कुणाचंही सुख पाहून तुम्ही फक्त ते Ok केलंत, तक्रार केली नाही, चरफड केली नाही तर ब्रम्हांड हसत म्हणतं.

“आवडलं ना? घे तुला पण”

तेच आपण, ह्यॅ !केलं, हे चूक आहे म्हटलं, त्याला मिळायला नको होतं म्हटलं, की त्याला मिळेल न मिळेल आधी तुमचा पत्ता कट होईल. ब्रम्हांड म्हणेल, याला मी दिलेलं अमुक अमुक आवडत नाहीये याला देऊ नका, त्याला आवडतं ते द्या.

काय आवडतं?

  • जळफळाट करायला आवडतं, म्हणूनच सारखा करतो. Ok पाठवा रे आणखी माणसं त्याच्या आयुष्यात, दाखवा त्याला सगळी आनंदात जल्लोष करणारी माणसं…मुबलक, भरपूर …
  • कर भरपूर जळफळाट,
  • ब्रम्हांड म्हणजे मुबलकता, भरपूर …
  • काय हवंय ते मिळेल, ते सांगण्याची भाषा आहे फिलिंग्स Vibrations
  • तुमच्या भावना ऐकतं ब्रम्हांड, मग भावना कशा हव्यात,
  • तर कृतज्ञतेच्या आणि समाधानाच्या.
  • कौतुकाच्या आणि प्रशंसेच्या…
  • God Bless You मंत्र म्हणत रहायचं, कुणालाही पाहून कितीही चरफड होत असली तरी, काय?

©कांचन दीक्षित